शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय…

पुणे : राज्यातील पूर आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई येथून जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार, बाधित शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासोबतच त्यांना विविध प्रकारची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाच्या वसुलीवर एक वर्षासाठी स्थगिती आणली आहे.विविध वित्तीय संस्थांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जांना हा नियम लागू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिकचा वेळ मिळेल.
यासोबतच, केवळ वसुलीला स्थगिती न देता या कर्जांचे पुनर्गठन (Restructuring) करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल आणि ते आपल्या शेतीवर पुन्हा लक्ष केंद्रित करू शकतील. यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
दरम्यान, कर्जमाफीच्या निर्णयासोबतच सरकारने आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरीव आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यामध्ये जीवितहानी झाल्यास मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत दिली जाईल. अपंगत्वाच्या बाबतीत, ४० ते ६० टक्के अपंगत्वासाठी ७४,००० रुपये आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्वासाठी २.५० लाख रुपयांची मदत मिळेल.