शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ…

पुणे : सध्या उन्हाळा वाढू लागला आहे. थंडीची तीव्रता कमी जाणवू लागली आहे. अशातच दूध पावडरला मागणी वाढल्यामुळे शेतकर्यांकडून घेण्यात येणार्या दुधाच्या खरेदी दरात बहुतांशी सहकारी दूध संघ आणि खासगी दूध प्रकल्पांनी प्रतिलिटरला एक रुपयाने वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

यामुळे आता गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटरला आता 32 रुपये झाला आहे. 11 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गायीच्या दुधाचे खरेदी दर लिटरला 31 रुपयांवर स्थिरावलेले होते. दूध पावडर आणि बटरची निर्यात सुरू असल्यामुळेही दुधाच्या खरेदीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
त्यामुळे गायीच्या दूध खरेदी दरवाढीला पाठबळ मिळाल्याचे सांगण्यात आले. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून दैनंदिन दूध संकलनात सध्या किंचित घट येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे दूध पावडर उत्पादक आणि खासगी डेअर्यांकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, वाढत्या स्पर्धेमुळे दूध संकलन टिकवून ठेवण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानेही (कात्रज डेअरी) गायीच्या दुधाच्या खरेदी दरात लिटरला एक रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पशुखाद्याचे दर वाढतच असल्याने हे दर 35 च्या पुढे असावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत.
गायीच्या दुधाचा खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाला 32 रुपये केला आहे. तशा परिपत्रकीय सूचना कात्रज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सर्व प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्था, डेअरी फार्मच्या सर्वांना देण्यात आल्या आहेत.