शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! कृषिमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, जाणून घ्या..


पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक जिल्ह्यांतील पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी राज्य सरकार पुढे सरसावले असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यांतील पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. अद्याप उर्वरित क्षेत्रांतील पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना सुरू असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.

       

राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली आहेत. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना विशेषत: मोठा फटका बसला आहे. शेतमाल पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढली आहे.

नांदेड जिल्ह्यात तब्बल ७.२८ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून तो सर्वाधिक प्रभावित जिल्हा ठरला आहे. यवतमाळमध्ये ३.१८ लाख हेक्टर, वाशीममध्ये २.०३ लाख हेक्टर, धाराशिवमध्ये १.५७ लाख हेक्टर, अकोला जिल्ह्यात १.७७ लाख हेक्टर तर बुलढाणा, सोलापूरसह इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून थेट आर्थिक मदतीचा दिलासा मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!