ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर…..

पुणे : सोन्याच्या दरात सुरू असलेली तेजी थांबली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून येत होती. पण आता या तेजीला ब्रेक लागला आहे. उच्चांकावर पोहोचलेल्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

आज (ता.२१ ) बाजारात सोनं आणि चांदी दोन्हीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी याचा फायदा घेत सराफा दुकानांत खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.

जळगावच्या बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 98,900 रुपये इतका झाला आहे, तर किलोभर चांदीचा दर 1,05,000 रुपये वर पोहोचला आहे. हे दर मागील काही दिवसांतील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

सोनं तब्बल 600 रुपयांनी, तर चांदी 4,000 रुपयांनी कमी झाली असून यामुळे ग्राहकांना जणू “डबल लॉटरी” लागल्यासारखं वाटत आहे.या घसरणीचा फायदा घेण्यासाठी जळगावकर ग्राहकांनी सकाळपासूनच सराफा दुकाने गाठली आणि अनेकांनी गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे.
व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायल-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मागील काही दिवसांत सोनं-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली होती. जागतिक स्तरावर तणावाचे वातावरण असल्याने सोनं-चांदीला ‘सेफ हेवन’ मानलं जातं. त्यामुळे अनेकांनी या धातूंत गुंतवणूक केल्याने दर गगनाला भिडले होते.
दरम्यान, जळगावमध्ये सोन्या-चांदीच्या घसरणीचा परिणाम लगेचच बाजारात दिसून आला. लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांनी, गुंतवणुकीसाठी चांदी घेणाऱ्यांनी आणि लहानसहान दागिने बनवण्यासाठी ग्राहकांनी सराफा दुकाने गजबजून टाकली. काही दुकानांमध्ये तर रांगा लागल्याचंही चित्र पाहायला मिळालं.
मात्र, आता परिस्थिती तुलनेने स्थिर होत असल्याने आणि जागतिक बाजारात सुधारणा होत असल्याने दरात घसरण झाली आहे. व्यावसायिकांचं म्हणणं आहे की, “युद्धजन्य भीतीवर आधारित दर वाढ आता खोट्या आधारावर होती, म्हणूनच घसरण आली आहे.
