आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोंधळ’ची दणदणीत कामगिरी; 56 वर्षात पहिल्यांदाच पटकावला पुरस्कार


पुणे : मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ताकद दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. गोव्यात झालेल्या भारतीय सरकारच्या 56 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये ‘गोंधळ’ने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या 56 वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय अधिकच ऐतिहासिक ठरला आहे.

यंदा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये 1130 चित्रपटांची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील 570 फिचर फिल्म्स होत्या. त्या चित्रपटांमधून हा ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका’चा अवॉर्ड ‘गोंधळ’ला मिळाला असून पंधरा लाख रुपये रोख आणि मानांकन असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.हा सोहळा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, ऋषभ शेट्टी, रणबीर सिंग, नवाजुद्दीन सिद्दीकी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, लोकपरंपरा आणि मानवी भावना यांचं प्रभावी चित्रण करतो. नवरा–नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या ‘गोंधळ’ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहाणारी कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहाता अंधश्रद्धा, कुटुंबातील नात्यांचे संघर्ष, समाजात बदलणारे दृष्टिकोन आणि माणसांच्या मनात दडलेला रहस्याचा धागा यांचाही वेध घेते. भव्य सादरीकरण, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक दृष्टीने उत्तम बांधणी यामुळे ‘गोंधळ’ मराठी संस्कृतीचं मूळ जागतिक प्रेक्षकांसमोर ताकदीने सादर करणारा ठरला आहे.

या यशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, ‘‘‘इफ्फी’ सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात ‘गोंधळ’ला मिळालेला हा सन्मान आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा गौरव आहे. हा चित्रपट म्हणजे आपल्या संस्कृतीशी, मातीशी आणि लोकपरंपरांशी असलेलं नातं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!