धक्कादायक…! आता ‘अमूल’च्या आईस्क्रीममध्ये सापडली गोम; व्हिडिओ शेअर करत महिलेने केले गंभीर आरोप


मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये आईस्क्रीममध्ये माणसाचं बोट सापडल्याची घटना ताजी असतानाच आता आईस्क्रीममध्ये गोम सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अमूल कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये गोम सापडल्याचा दावा एका महिलेने केला आहे. दीपा देवी असं महिलेच नाव आहे .
नोएडामध्ये आइस्क्रीमच्या डब्यात गोम सापडल्याची घटना समोर आली आहे. सेक्टर-12 मध्ये राहणाऱ्या दीपाने शनिवारी सकाळी ऑनलाइन डिलिव्हरी ॲप ब्लिंकिटवरून अमूलचे आईस्क्रीम ऑनलाइन ऑर्डर केले होते. या महिलेने दावा केला आहे की, तिने अमूल आईस्क्रीमचा डबा उघडला तेव्हा त्यात एक गोम होती. या घटनेमुळे महिलेसह संपूर्ण कुटुंबियांना धक्का बसल्याचंही महिलेने सांगितलं आहे. दरम्यान, महिलेच्या खळबळजनक दाव्यामुळे नागरिक आता अमूलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

अमूल ही भारतातील सर्वात मोठी डेअरी कंपन्यांपैकी एक आहे, आणि तिची उत्पादने देशभर वापरली जातात. दूध, दही, चीज, लोणी आणि आईस्क्रीम यांसारख्या उत्पादनांसाठी अमूल एक विश्वासार्ह ब्रँड आहे. पण नोएडातील या घटनेने लोकांच्या मनात गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. महिलेच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर, अमूलसारखी मोठी कंपनीही आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नसेल, तर कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला.