खरेदीची सुवर्णसंधी! गुढीपाडव्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

मागील तीन दिवसांत सोनं आणि चांदीच्या दरात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑल इंडिया सराफा असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेत कमकुवत राहिल्यामुळे आणि अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव वाढला आहे. या परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला असून सोनं आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत.

या घसरणीचा सर्वाधिक परिणाम चांदीच्या दरांवर दिसून आला आहे. सर्व करांचा समावेश करून चांदीच्या किंमतीत सुमारे 9,000 रुपयांची मोठी घट झाली आहे. त्यानंतर चांदीचा दर प्रति किलोग्राम 2,56,500 रुपयांवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच्या तुलनेत ही मोठी घट मानली जात आहे.
शुक्रवारीदेखील चांदीचा भाव याच पातळीवर म्हणजेच 2,56,500 रुपये प्रति किलो इतकाच नोंदवला गेला होता. सोन्याच्या किमतींमध्येही सलग तिसऱ्या दिवशी घट झाल्याचं चित्र दिसून आलं आहे. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,950 रुपयांची घसरण झाली आहे.
सर्व करांचा विचार केल्यानंतर सध्या सोन्याचा भाव अंदाजे 1,60,250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला जात आहे. मागील काही आठवड्यांत सातत्याने वाढलेले दर पाहता ही घट ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे.
देशातील विविध शहरांमध्येही सोन्याच्या दरांमध्ये जवळपास समान प्रवाह दिसून येतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे 17 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,58,770 प्रति 10 ग्रॅम इतका आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,45,550 आणि 18 कॅरेट सोन्याचा दर ₹1,19,120 प्रति 10 ग्रॅम आहे.
दरम्यान, आर्थिक राजधानी मुंबई तसेच पुणे येथे 24 कॅरेट सोनं ₹1,58,620, 22 कॅरेट ₹1,45,400 आणि 18 कॅरेट ₹1,18,970 प्रति 10 ग्रॅम इतकं आहे. कोलकाता शहरातही हेच दर कायम आहेत. मात्र चेन्नई येथे किंमती थोड्या जास्त असून 24 कॅरेट सोनं ₹1,59,820, 22 कॅरेट ₹1,46,500 आणि 18 कॅरेट सोनं ₹1,23,300 प्रति 10 ग्रॅम इतकं नोंदवलं गेलं आहे.