युवकांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आयटी पार्क होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

सोलापूर : सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील तरुण-तरुणींना नोकरीसाठी आता मुंबई-पुण्याला जाण्याची गरज भासणार नाहीये. कारण, सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून युवकांना मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे नोकरीसाठी स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी या योजनेबाबत माहिती दिली.
तसेच जिल्हा प्रशासनाने योग्य जागा निश्चित केली की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आयटी पार्क उभारल्याने स्थानिक युवक-युवतींसाठी हजारो नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. या पार्कमध्ये विविध आयटी उद्योग, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान आधारित कंपन्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
दरम्यान, सोलापूरमध्ये आधीच चांगले रस्ते आणि विमानतळ सेवा उपलब्ध झाल्याने उद्योगांना आवश्यक सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे या परिसरातील औद्योगिक विकासालाही मोठी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. शहरात बंद जलवाहिनी प्रकल्प सुरू करण्यात आला असून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पालाही गती देण्यात आली आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पुरवण्यासाठी 850 कोटींच्या जल वितरण वाहिनी प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, याशिवाय, सोलापूर विमानतळाच्या अतिरिक्त कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या सर्व उपक्रमांमुळे सोलापूरच्या विकासाला नवे बळ मिळेल.