Gold Price : दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, काय आहेत आजचे दर? जाणून घ्या…
Gold Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
तसेच दिवाळीच्या तोंडावर रोज सोन्याचे दर वाढताना दिसत आहे. शनिवारी (ता.१९) दुपारी सोन्याच्या दराने सर्वोच्च दराचा नवीन विक्रम नोंदवला आहे. दरम्यान, दिवाळीतही सोन्याचे दर वाढण्याचे संकेत असल्याने दागिने खरेदीसाठी इच्छुकांमध्ये चिंता वाढली आहे.
सणासुदीत नागपूरसह देशभरात दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते. तर लग्न समारंभ, बारसेसह इतरही अनेक कार्यक्रमात नागरिक भेट म्हणून सोने- चांदीच्या वस्तू देतात. त्यामुळे अनेकांचे दिवाळीतील सोन्याच्या दराकडेही लक्ष असते.
नवरात्रीपूर्वी ३० सप्टेंबरला नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर सकाळी ११ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. परंतु त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. Gold Price
आज दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर प्लॅटिनमचेही दरही १९ ऑक्टोबरला सकाळी ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले.
दरम्यान हल्लीच्या सोन्याच्या दरातील मोठ्या बदलामुळे सराफा व्यवसायिकांमध्येही चिंता वाढली आहे. परंतु सराफा व्यवसायिकांकडून मात्र हे दर आणखी वाढण्याचे संकेत असून आताच्या काळात सोने- चांदीमध्ये गुंतवणूक लाभदायक असल्याचा दावा केला जात आहे.
नागपुरातील सराफा बाजारात ३० सप्टेंबरला चांदीचे दर ९१ हजार ८०० रुपये होते. हे दर दिवाळीच्या तोंडावर १९ ऑक्टोबरला म्हणजेच आज दुपारी ९६ हजार ३०० रुपये नोंदवण्यात आले आहे.