सोन्याच्या चेन, हिऱ्याच्या अंगठ्या आणि….!! ’या’ महिला अधिकाऱ्याच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड, घटनेने खळबळ

नवी दिल्ली : आसाम सिव्हिल सर्व्हिसेसची अधिकारी नुपूर बोरा हिला अटक करण्यात आली आहे. बारपेटा येथील तिच्या घरातून लाखो रुपयांची कॅश तसेच सुमारे १ कोटींचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. अवघ्या ६ वर्षांच्या सेवेत तिने जमवलेली संपत्ती पाहून तपास अधिकारीही थक्क झाले.

व्हिजिलन्स टीमने बारपेटा आणि गुवाहाटीतील तिच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत १४ सोन्याच्या चेन, १५ हिऱ्याच्या अंगठ्या, २ हिऱ्याचे हार, ३ सोन्याच्या बांगड्या जप्त झाल्या. त्याशिवाय गुवाहाटीतील माळीगाव फ्लॅटमधून ८१.८३ लाख रुपये कॅश आणि बारपेटा येथील घरातून १०.६७ लाख रुपये रोख सापडले. अशा प्रकारे एकूण ९२.५० लाख रुपये आणि जवळपास १ कोटींचे दागिने हाती लागले.
दरम्यान, २०१९ मध्ये सेवेत दाखल झालेल्या नुपूर बोराने अल्पावधीतच संपत्तीचा डोंगर उभारला. तपासात तिची मालमत्ता उत्पन्नापेक्षा तब्बल ४१६.२६% जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुवाहाटीत तिच्या नावावर ३ फ्लॅट आणि २ भूखंड, तर UPI पेमेंटद्वारे ९ लाखांचा व्यवहार झाल्याचेही पुरावे मिळाले आहेत. तपास अधिकारी रोझी कलिता यांनी ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती असल्याचे सांगितले आहे.

तसेच नुपूर बोरा हिचे आयुष्यही वादग्रस्त राहिले आहे. तिचे दोनदा लग्न आणि दोनदा घटस्फोट झाले आहेत. पहिल्या विवाहातून तिला एक मुलगी आहे. कार्बी आंगलोंग, बारपेटा आणि गराईमारी येथे कार्यरत असताना तिने जमिनींच्या व्यवहारातून भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवली असल्याचे आरोप आहेत. तिचे नाव सुरजीत डेका या सहकाऱ्यासोबतही जोडले जात असून, या प्रकरणात त्याचाही सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
३१ मार्च १९८९ रोजी जन्मलेली नुपूर बोरा ही शिक्षक कुटुंबातून आलेली आहे. गुवाहाटीतील कॉटन कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर तिने इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली. नागरी सेवेत येण्यापूर्वी ती शिक्षिका आणि व्याख्याता म्हणून काम करत होती. सप्टेंबर २०१६ मध्ये सरकारी शाळेत पहिली नोकरी मिळाली, तर २०१९ मध्ये ACS सेवेत दाखल झाली. परंतु, अल्पावधीतच तिने भ्रष्टाचाराचे जाळे विणून प्रचंड संपत्ती जमवली.