26 जानेवारीला सोन्या-चांदीचा धूमाकूळ, दरात झाली मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे दर…

पुणे : आज 26 जानेवारी 2026… देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन. आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याने प्रथमच प्रति औंस 5000 डॉलरचा टप्पा ओलांडला असून चांदीही विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

त्यामुळे भारतातही आज सोन्या-चांदीच्या किमतींबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या तेजीचा आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट परिणाम दिसून आला आहे.
COMEX वर सोन्याचा दर 5,046.70 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 106.81 डॉलर प्रति औंस इतका नोंदवण्यात आला. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम थेट भारतीय बाजारपेठेवरही होत असून गुंतवणूकदारांसह ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

तसेच आज प्रजासत्ताक दिनामुळे MCX वर व्यवहार नसले तरी, देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1 लाख 60 हजार 250 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 46 हजार 890 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 20 हजार 180 रुपये इतका आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 60 हजार 400 रुपये असून मुंबईत तो 1 लाख 60 हजार 250 रुपये आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 59 हजार 480 रुपये तर कोलकातामध्ये 1 लाख 60 हजार 250 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस ठरला आहे.
आज भारतात 1 किलो चांदीचा दर 3 लाख 34 हजार 900 रुपये इतका झाला आहे. काही स्थानिक बाजारांमध्ये, विशेषतः जळगावच्या सराफ बाजारात, चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 60 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीतही मोठी उसळी पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांचा ओघ वाढत आहे.
