बुधवार पेठेत जाणं पुण्याच्या आयटी इंजिनिअरला महागात पडलं, आधी ब्लॅकमेलिंग, मग पोलिसांकडून….,नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या व्यक्तींचे व्हिडीओ चित्रित करुन त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांनी एका आयटी इंजिनिअरला अशाचप्रकारे गाठून त्याच्याकडून २० हजार रुपयांची मागणी केली.
हा आयटी इंजिनिअर तरुण सिंहगड रोडवरील किरकिटवाडी भागात राहायला होता. तो आणि त्याचा मित्र १३ जुलैला एका कामानिमित्त बुधवार पेठेच्या परिसरात गेले होते. त्यावेळी हा तरुण त्याची बाईक घेऊन बुधवार पेठेच्या परिसरात उभा होता.
त्यावेळी आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांनी मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ काढला. काम आटोपल्यानंतर या दोघांनी आयटी इंजिनिअरचा नांदेड सिटी येथील घरापर्यंत पाठलाग केला. हा तरुण विवाहित होता. हा प्रकार घडला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलं घरी नव्हती.
आयुष चौगुले आणि सदफ पठाण यांनी या तरुणाला घराजवळ गाठून, ‘तू बुधवार पेठेत कशाला गेला होतास?’, असा प्रश्न विचारला. त्यानंतर आयुष आणि सदफने बुधवार पेठेत चित्रित केलेला व्हिडीओ दाखवून तरुणाला धमकावले. त्याच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, या तरुणाने पैसे देण्यास नकार दिला.
त्यानंतर आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांनी संबंधित तरुणाला घाबरवण्यासाठी आणखी एक डाव टाकला. ‘तू आमच्याकडून २० हजार रुपये रोख घेतले आहेत. हे पैसे तू आम्हाला ऑनलाईन पद्धतीने परत देणार होतास. तू ते पैसे दिले नाहीस तर आम्ही पोलिसांत तक्रार करु. चौकशीवेळी आम्ही बुधवार पेठेतील तुझे व्हिडीओ आणि फोटो पोलिसांना देऊ. तुझी बदनामी करु’, असे आयुष आणि सदफने संबंधित तरुणाला सांगितले.
त्यानंतरही हा तरुण त्यांना पैसे द्यायला तयार नव्हता. अखेर या दोघांनी पोलीस हेल्पलाईनवर फोन करुन पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांकडे या दोघांनी आयटी इंजिनिअर असलेल्या तरुणाची तक्रार केली. सुरुवातीला पोलिसांना आयुष आणि सदफचे म्हणणे खरे वाटले आणि त्यांनी तरुणालाच जाब विचारायला सुरुवात केली.
अखेर एका स्थानिक पत्रकाराच्या मदतीने या तरुणाने आपली बाजू पोलिसांना तपशीलवार समजावून सांगितली. तेव्हा हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला आणि त्यांनी आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांना अटक केली.