भीमा-कोरेगावला जाताय? ‘या’ मार्गावर प्रवास मोफत, PMP प्रशासनाची मोठी घोषणा, जाणून घ्या..

पुणे: भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून लाखो अनुयायी दाखल होत असतात. दाखल झालेल्या अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच 1 जानेवारी निमित्त होणारी गर्दी आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन प्रशासनाने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दोन दिवसांसाठी विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पार्किंगच्या ठिकाणांपासून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि अनुयायांना सन्मानाने पोहोचवण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद, शिक्रापूर आणि वढू परिसरातील निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणांवरून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी सुमारे 250 पेक्षा जास्त मोफत बसेस धावणार आहेत. 31 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासूनच ही सेवा सुरू होईल.

यामध्ये पेरणे गाव, फुलगाव, तुळापूर फाटा आणि खंडोबा माळ यांसारख्या विविध ठिकाणांचा समावेश आहे. तसेच शिक्रापूर रस्त्यावरील पार्किंगमधूनही 140 विना तिकीट बसेसची सोय करण्यात आली आहे. वढू गावच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांसाठीही स्वतंत्र 10 मोफत गाड्यांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून येणाऱ्या लोकांसाठी मुख्य स्थानकांवरून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. पुणे स्टेशन, मनपा भवन, अप्पर डेपो आणि पिंपरीतील आंबेडकर चौक यांसारख्या 6 महत्त्वाच्या ठिकाणांहून एकूण 105 अतिरिक्त बसेस प्रवाशांच्या सेवेत असतील. या शहरांतर्गत धावणाऱ्या बसेस तिकीटधारक असतील आणि त्या अनुयायांना लोणीकंदपर्यंत पोहोचवतील. या दोन दिवसांत एकूण 400 हून अधिक बसेस रस्त्यावर उतरवून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न पीएमपीने केला आहे.
