पुण्यातील कॅफे गुडलकला सापडलेले काचेचे तुकडे पडले महागात, अन्न व औषध विभागाचा झटका, परवाना तात्पुरत्या काळासाठी निलंबित…

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध फूड जॉइंट गुडलक कॅफेमधील सर्वांचं आवडतं खाद्यपदार्थ बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली. बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित केला आहे.

तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबित राहणार आहे. डेक्कन परिसरातील गुडलक कॅफेमध्ये एक दाम्पत्य नाश्त्यासाठी गेले असता, त्यांनी घेतलेल्या बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळले.
या दाम्पत्याने या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, अद्याप पोलीस तक्रार दाखल झालेली नाही, असे डेक्कन पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बन मस्क्यात काचेचे आढळल्यामुळे ‘गुडलक कॅफे’चा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केला आहे. तर पुढील तपासासाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असं सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन सुरेश अन्नपुरे यांनी म्हटलं आहे.