लागा तयारीला! पुण्यासह 12 जिल्हा परिषदेच्या निवडणूका 8 जानेवारीपासून लागण्याची शक्यता

पुणे :राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे लागले आहे. अशातच आता पुण्यासह 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर आरक्षणचा तिढा अजूनही कायम असल्यामुळे या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. त्यानुसार आयोगाने या निवडणुकांसाठीची तयारी पूर्ण केली असून 8 जानेवारी पूर्वी जिल्हा परिषद आणि निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याची मुदत दिली असली तरी प्रत्यक्षात सर्व जिल्हा परिषद निवडणुका या कालावधीत होणे अवघड मानले जात आहे. मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यातील वीस जिल्हा परिषदमध्ये आणि 211 पंचायत समितीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने या ठिकाणच्या निवडणुकांना ऐनवेळी सध्या स्थगिती देण्यात आले आहे त्यामुळे याआरक्षणाच्या नियमांचे पालन झालेल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील एकूण 32 जिल्हा परिषदांपैकी बारा जिल्हा परिषद मध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादेचे पालन झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार असल्यास जवळपास निश्चित मानले जात आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे,सातारा,सांगली, कोल्हापूर,छत्रपती संभाजी नगर,परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदेचा समावेश आहे.
संभाव्य निवडणुकीचा कार्यक्रम असा होणार:-
निवडणूक जाहीर : 6 ते 8 जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल : 10 ते 17 जानेवारी
छाननी व माघार : 18 ते 20 जानेवारी
चिन्ह वाटप : 21 जानेवारी
मतदान : 30 जानेवारी
मतमोजणी : 31 जानेवारी
