बायकोच्या वाढदिवसासाठी चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो, कार्यक्रमात फेटे, शिट्ट्यांचा पाऊस…!

बीड : सध्या सोशल मीडियावर एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणाले डान्सर गौतमी पाटील. राज्यात सध्या डान्सर गौतमी पाटीलचीच चर्चा सुरू आहे. तिचे अनेक चाहते आहेत. असे असताना आता एका पठ्ठ्याने बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला.

गौतमीच्या हाताने त्याने केकही कापला. यामुळे याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. गौतमीच्या कार्यक्रमात लोकांना उभं राहायला जागा राहत नाही. लहान पोरांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचे चाहते आहेत.
अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमात हाणामाऱ्याही होताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. गौतमीच्या डान्सची क्रेझ इतकी की आता कोणत्याही निमित्ताने तिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला जात आहे.

लहान मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील तिचा डान्स ठेवला जात आहे. दरम्यान, आता आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांची पत्नी प्रगती गावडे यांचा वाढदिवस होता. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेण्यात आला.
गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. गौतमी पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आल्यानंतर गौतमी पाटील यांचा स्टेज शो झाला. यावेळी हजारो लोकांनी गर्दी केली होती. गौतमीच्या प्रत्येक गाण्यावर आणि तिच्या अदाकारीवर गावकरी फेटे उडवत होते.