गॅस कटरने एमटीएम फाेडले; सहा लाखांची राेकड पळविली, सोरतापवाडी येथील घटनेने उडाली खळबळ..

उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीत असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडल्याचे प्रकार समोर आला आहे.
ही घटना गुरुवारी (ता. २७) पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत अज्ञात दोन चोरट्यांनी एटीएम मधील तब्बल सहा लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, , मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे एटीएम सेंटरमध्ये घुसले. गॅस कटरच्या मदतीने त्यांनी मशीन फोडली आणि त्यातील रक्कम घेऊन पसार झाले. या घटनेने नंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा प्रकार पहाटे उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार चौधरी, जाधव व यादव तात्काळ दाखल झाले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासणीसाठी घेतली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. , या भागात यापूर्वीही एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या असून, सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.