Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा अजून एक कारनामा उघड, महिलेला ‘ते’ शब्द वापरल्याने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

Ganpat Gaikwad : कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढत आहेत. पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बरनाथ तालुक्यातील द्वारली गावामध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून महिलेला जातिवादक अपशब्द वापरणे आमदार गणपत गायकवाड यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार महिला ही द्वारली गावात राहत असून तिच्या मृत सासऱ्यांच्या नावावर द्वारली गावात जमीन आहे. ही महिला ३१ जानेवारीला दुपारी आपल्या जाऊबाईसोबत जमिनीच्या ठिकाणी गेली होती. यावेळी त्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांचे काही साथीदार देखील उपस्थित होते.
या जमिनीच्या मालकी हक्काचा वाद न्यायालयामध्ये पोहोचला आहे. याबाबत निकाल लागणे बाकी असल्याने वादग्रस्त जमिनीभोवती पत्र्याचे कुंपण घालण्यास त्यांना विरोध केला. त्यावेळी आमदार गणपत गायकवाड हे फावड्याचा दांडका घेऊन महिलेच्या अंगावर धावले आणि जातीवाचक अपशब्द वापरला. Ganpat Gaikwad
महिलेला जातीवाचक अपशब्द वापरून तुम्ही कोर्टात जा तुमची जमीन घेणारच असा दम देखील दिला. त्यानंतर गायकवाड यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी देखील यावेळी महिलांना शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
या तक्रारीवरून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत.
दरम्यान, गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने गणपत गायकवाड यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.