धंदा करायचा असेल तर आता हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुझ्यासह दुकान फोडीन…, गुंडांचा शेवाळवाडीत राडा…

पुणे : दुकानातून सामान घेऊन धंदा करायचा असेल तर आम्हला हप्ते द्यावे लागतील, नाही तर एकाएकाला त्यांच्या दुकानासोबत फोडून टाकू अशी धमकी देऊन तिघा गुंडांनी राडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शेवाळवाडी येथील चैतन्य स्वीटससमोर रविवारी (ता. १३) दुपारी तीन वाजता घडला.
याबाबत हिराराम चेनाराम देवासी (वय ३४, रा. शेवाळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय साळुंके (वय २०), शुभम गवळी, सुदाम साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचे शेवाळवाडीत चैतन्य स्वीटस हे दुकान आहे. ते दुकानात असताना तिघे गुंड दुकानात आले. अजय साळुंके याने पाणी बाटली, बाकरवडी तसेच रेड बुल ड्रिंक घेतले.
फिर्यादी यांनी त्याचे पैसे मागितल्यावर तुम्ही लोकं बाहेरुन येऊन येथे धंदा करता, तुम्हाला येथे धंदा करायचा असेल तर, तुम्हाला आम्हाला प्रत्येक महिना ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही तुला व तुझे दुकान देखील फोडीन, अशी धमकी दिली.
त्यानंतर ते दुकानाबाहेर आले. लोखंडी हत्यार हातात घेऊन ते हवेत फिरवून दहशत करीत मोठ्यमोठ्याने आरडाओरडा करीत शिवीगाळ करुन येथे जर धंदे करायचे असतील तर प्रत्येकाने आम्हाला प्रत्येक महिन्याला हप्ते द्यावे लागतील, नाही तर एकएकाला त्याच्या दुकानासोबत फोडून टाकू, असे बोलून दहशत पसरवली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.