गॅंगवॉरने पुणे हादरलं! आंदेकर टोळीतील चार जणांकडून एका व्यक्तीला धडाधड गोळ्या, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू….

पुणे : गेल्या काही दिवसापासून विद्येच माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच आता पुण्यातील कोथरूड परिसरात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. गणेश काळे नावाच्या व्यक्तीवर आंदेकर टोळीतील चार जणांकडून गोळीबार करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार देखील करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात २ आरोपींनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळे याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या गणेश काळे याला लागल्या. त्याचवेळी दुचाकीवरून उतरलेल्या दोघांनी त्याच्या शरीरावर कोयत्याचे वार केले. काही मिनिटांतच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी दत्ता काळे याचा भाऊ असल्याची माहिती आहे. दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी आहे. तो अजूनही तुरूंगात आहे. गणेशवर गोळीबार करण्याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पुण्यात भडकलेल्या टोळीयुद्धाची चर्चा होत असताना गणेश काळे याच्यावरील हल्ला हा टोळीयुद्धातून झालेला नाही, असे स्पष्टपणे पुणे पोलिसांनी सांगितले. गणेशच्या खुनाचे कारण आम्ही लवकरच शोधून काढू, आरोपींना देखील लगोलग अटक करण्याचा प्रयत्न करू, असे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
