ऊरूळी कांचन येथील डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या टोळीला बेड्या, ड्रायव्हरच निघाला अपहरण-खंडणीचा मास्टरमाईंड…


उरुळी कांचन : ऊरूळी कांचन परिसरात एका नामांकित डॉक्टरचे अपहरण करून त्याच्याकडून तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीला अवघ्या ४८ तासांत जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलिसांनी केली आहे. या धक्कादायक प्रकरणात डॉक्टरांचा स्वतःचा ड्रायव्हरच अपहरणाचा सूत्रधार असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

राजेंद्र छगन राजगुरु (वय. ३२ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. अनंतपुर, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) संतोष सोमनाथ बनकर (वय ३६ वर्षे, रा. अनंतपुर, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) ३ दत्ता ऊर्फ गोटू बाळू आहेर (वय ३४ वर्षे व्यवसाय शेती, रा. अनंतपुर, सी.आर. गेट, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर (वय ३० वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. गणेश नगर, गारखेडा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावरून कुंजीरवाडीच्या दिशेने १० जानेवारी रोजी रात्री जात असताना डॉ. विठ्ठल चौधरी यांच्या कारला इनामदार वस्ती परिसरात पांढऱ्या रंगाच्या इरटिगा कारने अडवण्यात आले. काही क्षणांतच चार जण डॉक्टरांच्या कारमध्ये घुसले. चाकूचा धाक दाखवत त्यांनी डॉक्टरांचे अपहरण केले आणि त्यांना मारहाण करत शिंदवणेच्या दिशेने नेले.

या दरम्यान आरोपींनी डॉक्टरांकडून आधी चार लाख रुपये उकळले आणि चौफुला परिसरात त्यांना सोडून दिले. मात्र, धमकीची मालिका इथेच थांबली नाही. पुढील दोन दिवसांत आणखी १५ लाख रुपये मागून घेतल्याने एकूण खंडणीची रक्कम १९ लाखांवर पोहोचली.

दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. फिर्यादी व साक्षीदारांकडे तपास करत असताना पोलिसांनी डॉक्टरांचे ड्रायव्हर वरील संशय बळविला आणि ड्रायव्हरचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तपास पथकाने ड्रायव्हर राजेंद्र छगन राजगुरु ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने डॉक्टरांचे अपहरण त्यांच्या साथीदारांच्या मदतीने करून खंडणी घेतली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या तिन्ही साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून अपहरणासाठी वापरलेली इरटिगा कार आणि ७.८० लाखांची खंडणी रक्कम जप्त करण्यात आली असून, एकूण १५.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.

उरुळीकांचन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांघडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!