पाटस टोलनाक्यावर मद्यविक्री करणाऱ्या टोळीला दणका ; 31 लाखाहुन अधिक मुद्देमाल जप्त, 5 आरोपी अटकेत

पुणे; पुणे जिल्ह्यात मद्यविक्री करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. गोव्यातून अवैधरित्या मद्याची वाहतूक करून पुणे जिल्ह्यात विकणाऱ्या टोळीवर कारवाई करत 31 लाखाहून अधिक किमतीचा मद्यसाठा आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दौंड विभागाच्या पथकाने पाटस टोलनाक्याजवळ सापळा रचून दंडन संशयित कार्स अडवून तपासणी केला असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक व्हिस्कीचे 43 बॉक्स आढळून आले. याप्रकरणी संतोष मारकड आणि वैभव तरंगे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची कसून चौकशी केली असता संतोष मारकडच्या घरी 132 बाटल्या, 559 बुचेसह साठा सापडला. तसेच चंदनवाडीतील हॉटेल गावकरी येथे विविध ब्रँडच्या 225 पेक्षा जास्त मद्य बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच हॉटेल पैलवान येथेही साठा आढळला. याप्रकरणी आरोपी आकाश कुंडली आणि कुणाल कोल्हे यांना अटक करण्यात आली. तसेच मोई येथील बबन पावणेच्या घरी छापा टाकून माल जप्त करण्यात आला. असा एकूण 31, 56,495 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहायुक्त प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
मद्यविक्री प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईत अधीक्षक अतुल कानडे, उपाधीक्षक उत्तम शिंदे, निरीक्षक विजय रोकडे, शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक एम. व्ही. गाडे, यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. पुढील तपास दुय्यक निरीक्षक गाडे करत आहेत.