हवेली तालुक्यात विद्युत रोहित्र लुटणारी टोळी जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त…


लोणी काळभोर : हवेली तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीयांना गुन्हे शाखेच्या युनिट-७ पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या ताब्यात असलेली तांब्याच्या तारांनी भरलेली पोती आणि टेम्पो असा एकूण ११ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे लोणी काळभोर, लोणीकंद आणि वाघोली पोलीस ठाण्यात दाखल एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
याप्रकरणी नुरहसन खलील खान (वय २७, सध्या रा. एकनाथ पठारे वस्ती, चंदननगर, पुणे, मूळ या. उत्तर प्रदेश) व भैय्याराम पट्टे यादव (वय २२, सध्या रा. दिवेगाव, ता. पुरंदर, जि. पुणे, मूळ उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर सह लोणीकंद व वाघोली परिसरात वारंवार विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारांची चोरी होत होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट-7 पथकाने विशेष पाळत ठेवली होती. गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, चोरी केलेल्या तांब्याच्या तारांसह आरोपी एमएच ४७ वाय ०६७६ क्रमांकाच्या पांढऱ्या टेम्पोमधून थेऊरहून कोलवडीकडे जाणार आहेत.

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केसनंद-थेऊर रोडवरील कोलवडी पुलाजवळ सापळा रचला. काही वेळात संशयित टेम्पो तेथे आल्यानंतर पोलिसांनी थांबवून झडती घेतली. त्यावेळी टेम्पोमध्ये तांब्याच्या तारांनी भरलेली ९ पोती आढळून आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने लोणी काळभोर, लोणीकंद व आसपासच्या भागातील ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी केल्याची कबुली दिली.

ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी झाल्यास परिसरातील वीजपुरवठा खंडित होतो. व सर्वसामान्य नागरिकांना व शेतकरी यांना नाहक त्रास होतो. या कारवाईमुळे परिसरात ट्रान्सफॉर्मर फोडून तांबे चोरी करणाऱ्या टोळीला मोठा आळा बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तसेच पोलीस कर्मचारी सारंग दळे, ऋषिकेश ताकवणे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नेहा तापकीर, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, महिला पोलीस कर्मचारी प्रतिक्षा पानसरे आणि कीर्ती मांदळे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!