Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पा मोरया! बाप्पाच्या आगमनाचे ३ मुहूर्त कोणते? जाणून घ्या…


Ganesh Chaturthi 2024 : आज गणेश चतुर्थी… महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सवाची आजपासून सुरवात होत आहे. या मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात आगमन करून त्यांची विधिवत पूजा करण्यात येत आहे.

देशभरातील विशेषत: महाराष्ट्रातील तरुणाईच्या उत्साहाला शनिवारी उधाण येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होईल. घरोघरी बाप्पांची स्थापना केली जाईल.

गणपती स्थापनेचे ३ मुहूर्त…

सकाळी ८ ते ९.३०, सकाळी ११.२० ते दुपारी १.४०, दुपारी २ ते सायंकाळी ५.३०

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवाच्या पूर्वतयारीवर, आरास सजावटीवर अखेरचा हात शुक्रवारी फिरवण्यात आला. काही मंडळांच्या आरास सजावटी खोळंबलेल्या आहेत. उत्सवाच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत त्या पूर्ण करण्याकडे मंडळांचा कल असेल.

गणेश स्थापनेसाठी यंदाच्या गणेशोत्सवातील पहिल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला दिवसभरात ३ मुहूर्त आहेत. ‘श्रीं’च्या मूर्तीची स्थापना सूर्यास्तापूर्वी करावी, असे विधान आहे. गणेश पुराणानुसार गणेशाचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्रात माध्यान्ह काळात म्हणजेच दिवसाच्या दुसर्‍या प्रहरात झाला होता. हा अत्यंत शुभ असा काळ शनिवारी ११.२० वाजेपासून सुरू होईल. Ganesh Chaturthi 2024

गणेश स्थापनेचा विधी…

सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून मूर्तीची स्थापना करावयाची असलेल्या जागेजवळ बसा आणि गणेश स्थापनेचा संकल्प सोडा.

स्वत:समोर शुभ्र कापड अंथरून त्यावर अक्षता ठेवा.

तांब्याच्या पात्रावर कुंकू अथवा चंदनाने स्वस्तिक रेखाटा. पात्र अक्षतांवर ठेवा.

…मग या पात्रावर गणेशमूर्तीची स्थापना करा.

गणेश पुराणानुसार शक्यतो शुद्ध तुपाचा दिवा लावा.

गणपतीला अष्टगंध आणि लाल चंदनाचा टिळा लावा.

फुले आणि बेलपत्राची माळ घाला. मोदक अर्पण करा.

लवंग, वेलदोडा, कापूर, केशर, सुपारीसह काथयुक्त पान अर्पण करा.

आरती करा. नंतर मूर्तीला २१ प्रदक्षिणा घाला. दक्षिणा अर्पण करा.

हे नियम पाळा…

तुळशीचे पान अर्पण करू नका.

पूजेदरम्यान काळे कपडे घालू नका.

दूर्वा आणि मोदकाशिवाय पूजा पूर्ण होत नाही, हे लक्षात असू द्या.

स्थापित मूर्तीला हलवू नये.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!