Gadchiroli News : गडचिरोलीतील गूढ हत्येचं रहस्य उलगडलं, सुनेनंच रचल घरातल्या पाच जणांना मारण्याचा डाव, कारणही सांगितलं…


Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथील एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश आलं आहे. या पाच लोकांची नैसर्गिक मृत्यू नसून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. हत्यारे दुसरे तिसरे कुणी नसून सून आणि मेहुण्याची पत्नी आहेत. वडिलांच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे. Gadchiroli News

मागील काही दिवसापासून अहेरी तालुक्यातील महागाव येथील रहिवासी शंकर पिरु कूभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या वीस दिवसांचे कालावधीत अचानक आजारी पडून मृत्यू झाल्याने त्या परिसरात भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अहेरी तालुक्यातील महागाव येथे २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे (वय ४५) यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व थकवा जाणवू लागल्याने स्वत:च्या कारमधून पती शंकर तिरूजी कुंभारे (५२) यांनी त्यांना चंद्रपूरला नेले.

तेथे गेल्यावर त्यांनाही अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तेही उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती झाले. प्रकृती अधिक बिघडल्याने दोघांना नागपूरला हलविले. पण उपचारादरम्यान २६ सप्टेंबर रोजी शंकर तर २७ सप्टेंबर रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, आई-वडिलांची प्रकृती बिघडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (वय २९, रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. तिचीही प्रकृती खालावली. तीन दिवस चंद्रपूर येथे उपचार केले.

त्यानंतर तिची सुटी झाली. मात्र, पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने अहेरी येथे ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पण प्रकृती अधिक खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले. तसेच शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (वय २८) हा सिरोंचा येथे पोस्ट मास्तर पदावर कार्यरत आहे. आई – वडिलांच्या निधनानंतर गावी आल्यावर त्याचीही प्रकृती खालावली होती. चंद्रपूर येथे उपचारानंतर त्यास नागपूरला खासगी दवाखान्यात हलविले होते. १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, त्याची मावशी आनंदा उराडे (वय ५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) या अंत्यविधीसाठी महागावला आल्या होत्या. ती देखील आजारी पडली. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी एसडीपीओ अहेरी सुदर्शन राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी तपास यंत्रणेने तात्काळ वेगवेगळे चार तपास पथक गठीत करुन त्यांची परिसरातील गोपणीय यंत्रणा सक्रिय करुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्रात तसेच तेलंगणा राज्यात तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याचे प्रयत्न सुरु केले असताना, परिसरातील गोपनीय सुत्रांकडून गावात शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे व साल्याची पत्नी रोझा रामटेके यांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे माहिती मिळाली.

त्यावरुन त्या दोघींच्याही हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवुन त्यांना आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता, त्या दोघींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा सखोल तपास केला असता, महिला आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याच्याशी तिच्या आई वडिलांच्या विरोधात जावून लग्न केले व या कारणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली

तसेच याबाबत पती रोशन व सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत. तसेच सहआरोपी रोझा रामटेके हिने तिच्या सासऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणी हिस्सा मागून नेहमी वाद करत असल्याच्या कारणावरुन त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे परिवार आणि त्यांचे नातलागांना विष देऊन जिवे ठार मारण्याची योजना आखली.

त्या योजनेप्रमाणे रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जावून विष आणले आणि ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये मिसळून त्यांना खाण्यास दिल्याने त्या विषाचा हळुहळु परिणाम होवून त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरवात झाली. त्यात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांचे परिवारातील नव्हता. परंतु तो त्यांच्या गाडीतील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्याने विषबाधा होवून तो आजारी पडला.

दरम्यान, दोन्ही महिला आरोपी यांना आज बुधवारी (ता.१८ ) रोजी अटक करण्यात आली. तसेच सदर गुन्ह्यात इतर आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!