मोठी अपडेट! 1 एप्रिलपासून सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का, ‘या’ वस्तू होणार महाग…

पुणे : नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात सर्वसामान्यांसाठी महागडी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. 1 एप्रिलपासून अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

वाहनांपासून ते घरगुती इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत अनेक उत्पादनांच्या दरात वाढ होणार असल्याचे समोर आले आहे. जागतिक बाजारातील बदल, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि वाहतूक खर्चातील वाढ या कारणांमुळे कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे कार, टीव्ही, फ्रीज आणि एअर कंडिशनर यांसारख्या वस्तूंच्या किमती सुमारे 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्लास्टिक, रेझिन आणि पॉलिमर यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

या घटकांचा मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये वापर होत असल्याने उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील मालवाहतुकीच्या दरातही वाढ झाल्याने कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडला आहे.
माहितीनुसार, जागतिक स्तरावर मालवाहतूक खर्च सुमारे 7 ते 10 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य सुमारे 2 टक्क्यांनी घसरल्याने आयात होणाऱ्या वस्तू आणखी महाग झाल्या आहेत. परिणामी, वाढलेला उत्पादन आणि वितरण खर्च कंपन्यांना ग्राहकांवर टाकावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आता अधिक खर्च करावा लागणार आहे. लक्झरी कार निर्मिती करणाऱ्या Mercedes‑Benz आणि Audi यांनी 1 एप्रिलपासून वाहनांच्या किमतीत सुमारे 2 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. इतर अनेक कार उत्पादक कंपन्याही आपल्या वाहनांच्या किमती 2 ते 3 टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
केवळ वाहनांच्याच नव्हे तर घरगुती उपकरणांच्या किमतीतही वाढ होणार आहे. टीव्ही, फ्रीज आणि एअर कंडिशनर यांसारख्या वस्तू 5 ते 6 टक्क्यांनी महाग होऊ शकतात. तसेच शूज आणि सिंथेटिक फायबरपासून बनवलेले कपडे 9 ते 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.