दोस्तांनो लिहीत राहा, गोरगरीबांना न्याय देत राहा, पत्रकार म्हणजे समाजबदलाचे खरे पाईक, बारामतीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केल्या भावना…

बारामती : पत्रकार म्हणजे समाज प्रबोधन आणि समाज बदलाचे खरे पाईक आहेत. जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून सामाजिक जीवनात काम करत असताना गुन्हेगारीला आळा घालून न्याय मिळवून देण्यासाठी ‘पत्रकारीता’ या घटकाची वेळोवेळी झालेली मदत खरोखरच कौतुकास्पद आहे, त्यांचे आभार मानने क्रमप्राप्त आहे, असे वक्तव्य बारामतीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

पत्रकार दिनानिमित्त ते म्हणाले, समाजात काम करताना पोलीस म्हणून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मग यात मानपान, मोठेपणा अशा गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून अनेक बाबींना सामोरे जावे लागते. तसाच प्रकार पत्रकार बांधवांनासोबतही घडतो. पत्रकार आणि पोलीस खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. तशी दोघांचीही दुःखे सारखीच आहेत.
उत्तम आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा पत्रकार बांधवांच्या साथीने मीही यशस्वी प्रयत्न केला. पत्रकार बांधवांना सोबत घेऊन आपल्याला असं करायचं आहे? या ठिकाणी असा बदल करायचा आहे? हे करावं लागेल, ते करावं लागेल! अशी अनेकवेळा चर्चा होती. याचे बदल देखील दिसतात.

चांगल्या कामाला वेळ का लावायचा? तुम्ही करा आम्ही पाठीशी आहोत! अस म्हणत पत्रकारांची ही अनमोल साथ अनेक बदल घडवणारी ठरली. जिथे काम केले, तिथल्या सर्व पत्रकार बांधवानी माझ्या कामाला विशेष गुण दिले. अनेक बातम्या वृत्तपत्राच्या मुख्य पानावर देखील आल्या. अनेक बातम्या टीव्ही चॅनेलवरही संबंध महाराष्ट्राने पाहिल्या.
आयुष्यात जेंव्हा बदलीसारखा कठीण प्रसंग आला तेंव्हा त्या ठिकाणाहून निरोप घेताना अनेक पत्रकार बांधवांचे पाण्याने भरलेले डोळे पाहून, आयुष्यात फक्त कामाची पोहोच पावतीच मिळाली. यामुळे आपण योग्य काम करतोय याची जाणीव देखील झाली. अनेक मोठी चांगली कामे केली तरी पोलीस आणि पत्रकारांच्या वाट्याला नेहमी बदनामी येतेच. पण यातून वाट काढत आपल्या कामाला आणखी सुंदर बनवण्याची कला आपल्याला आपसूक अवगत होते.
आज पत्रकार दिन आहे. माझ्या सर्व पत्रकार मित्रांना खूप-खुप शुभेच्छा.
दोस्तांनो, लिहीत रहा. गोरगरीबांना न्याय देत रहा. स्वतःची, कुटुंबाची आणि सोबतच आपल्या देशाची काळजीही घेत रहा. जय हिंद! अशा भावना व्यक्त करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.