लोणी काळभोर पोलीस ठाण्याजवळ दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी, चौघांकडून पोलिसालाच बेदम मारहाण…

उरुळी कांचन : दोन गटांत किरकोळ कारणावरून भरदिवसा बुधवारी (ता. २६) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना कदमवाकवस्ती येथील एमआयटी कॉर्नरजवळ घडली आहे.
तसेच यावेळी हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसालाही यामध्ये मारहाण झाल्याची चर्चा असून, भरदुपारी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एका बड्या महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर साखळी चोरीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही तरुण गांजा पीत बसले होते.
या वेळी लोणी काळभोर येथील नामांकित महाविद्यालयातील दोन विद्यार्थी सेवा रस्त्याने निघाले होते. त्यातील एकाचा पाय घसरला. आधारासाठी त्याने शेजारील दुचाकीला पकडले.
या वेळी दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे दुचाकी जमिनीवर पडली. त्यामुळे चार ते पाच जणांनी गाडी पडल्याच्या कारणावरून दोघांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी भांडणामध्ये मध्यस्ती करून भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला.
वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न करीत असतानाच, चौघांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.