पुणे एअरपोर्ट येथे नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक; विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
पुणे : पुणे एअरपोर्ट येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार एप्रिल २०२३ ते ५ जून २०२३ या कालावधीत विश्रांतवाडी येथे घडला आहे.
याप्रकरणी ॲलविन अरुमानायगम मोसेस (वय, ६० रा. मार्थोमा चर्चजवळ, धानोरी, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 7039172297, 9004196595, 9356879595 व 9702103585 या मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पुणे एअरपोर्ट येथे सिक्युरिटी गार्डव ॲडमीनमध्ये चांगल्या पदावर नोकरी असल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादी यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
नोकरीला लावण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांना ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी मोबाईल धारकांवर विश्वास ठेवून २ लाख ९८ हजार ७०० रुपये पाठवले.
पैसे पाठवून देखील आरोपींनी नोकरी दिली नाही तसेच पैसे परत केले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे करीत आहेत.