जम्मूच्या डोडा भागात लष्कर- दहशतवाद्यांत मोठी चकमक ! चार जवान शहिद ..!!
डोडा : जम्मूच्या डोडा भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली असून यामध्ये एका अधिका-यासह ४ जवान शहीद झाले. काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. या भागात दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने येथे शोधमोहीम राबवण्यात आली. गोळीबारात ५ जवान गंभीर जखमी झाले, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला.
अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्करावर अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. ८ जुलै रोजी लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते, याआधी कुलगामच्या विविध भागात चकमकीत ६ दहशतवादी मारले गेले होते, ज्यामध्ये २ जवानही शहीद झाले होते.
४ मे रोजीही दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता. यापूर्वी २६ जून रोजी डोडामध्येच ३ दहशतवादी मारले गेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून जम्मूमध्ये दहशतवाद कमी होताना दिसत होता, मात्र अलीकडच्या काळात येथे दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३२ महिन्यांत जम्मू परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे ४८ जवान शहीद झाले आहेत.