चार हात, दोन फोन आणि एक नाथ! शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण.., मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल..
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे ही सध्या ‘सियावर रामचंद्र की जय या बाल-महानाट्य’ प्रयोगात व्यस्त आहे. यासाठी राधिकाने शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा, यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत होती.
असे असताना कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे तिला अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर तिला शासनाचा हॉल मिळाला असून त्याबद्दल तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत.
दरम्यान, चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ते “चार हात, दोन फोन, एक नाथ. सियावर रामचंद्र की जय.
मी १८ एप्रिल ला माझी बाजू मांडत एक पोस्ट केली होती.
त्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हा उत्तरार्ध. मी मागच्या पोस्ट मध्ये म्हणाले होते, मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत.
तसेच घडले. ताजे टवटवीत फोटो आहेत, आठवणींच्या पेटीत मऊ मखमली शालीत ठेवण्यासारखे. त्यात आहेत नेते, अभिनेते, मंत्री, महामंत्री , प्रचारक, स्वयंसेवक, महागुरू आणि डॉक्टर. फोटो वर्तमानातला आहे. पण ह्यात मला भविष्यातली बलशाली पिढी घडताना दिसते आहे. देश बदल रहा है, तरक्की सुनिश्चित है, असं मला दिसतं आहे.
चार हात कामाला लागले, मला दोन फोन आले आणि सांगण्यात आलं की कसली ही काळजी करू नका, तुमचं काम होईल. वरिष्ठांनी दखल घेतली आहे. एकनाथ जी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुम्हाला आशेनं टॅग करत पोस्ट टाकली, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.