माजी आमदार संजय जगताप यांचा भाजप प्रवेश निश्चित ; १६ तारखेला घेणार भाजपचं कमळ हाती ….

पुणे : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना चांगलाचं वेग आला आहे. गेल्या काही दिवसात काँग्रेस पक्षातील नेत्यांनीं पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र धंगेकर आणि संग्राम थोपटे या दोन माजी आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का पुणे जिल्हात काँग्रेसला बसला आहे. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी सुद्धा काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे संजय जगताप हे पक्षातील सक्रिय राजकारणापासून बाजूला राहिले होते. त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने कार्यकर्त्यांचा पक्ष बदलण्यासाठी संजय जगताप यांच्यावर मोठा दबाव होता.येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सासवड आणि जेजुरी नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय अखेर संजय जगताप यांनी घेतला आहे.येत्या 16 तारखेला संजय जगताप यांचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असून, फक्त हा सोहळा मुंबईत करायचा की सासवडला मोठा मेळावा घेऊन पक्ष प्रवेश करायचा या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही. मात्र, संग्राम थोपटे यांच्यानंतर भाजपने काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम करून भाजपची
वाट धरल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती.संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडल्यापासून संजय जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होत, कार्यकर्त्यांनी जगताप यांना सत्तेच्या मार्गाने जाण्याचा आग्रह देखील धरला होता. अखेर त्यांनी पक्षाला रामराम करत भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला.
