माजी मंत्र्यांचा काँग्रेसचा ‘हात’ धरत महायुतीला दणका ; कोण आहेत पद्माकर वळवी?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.आदिवासी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाने महायुतीला चांगलाच दणका बसला आहे. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरु लागली होती. मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय समीकरण बदलणार आहेत.
कोण आहेत पद्माकर वळवी?
पद्माकर वळवी विद्यार्थी चळवळीतील नेते असून आदिवासी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. नंदुरबारमधील शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून ॲड. पद्माकर वळवी यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. 2009 मध्ये काँग्रेसकडून निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी नंदुरबार जिल्ह्यात दौऱ्यावर आले असतानापद्माकर वळवींनी ‘हात’ सोडत भाजपात प्रवेश केला होता. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देणार असल्याची चर्चा सुरु असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारत पद्माकर वळवी यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच त्यांनी चकवा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.