शरद पवारांचे निकटवर्तीय माजी मंत्री भारत भाऊ बोंद्रे यांचं निधन

पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक व राज्याचे जलपुरुष म्हणून ओळख असलेले भारत भाऊ बोंद्रे यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने चिखली येथे अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होताना दिसत आहे. 1967 पासून ते शरद पवार यांच्यासोबत होते. शरद पवारांचे एकनिष्ठ साथीदार म्हणून त्यांची ओळख होती.

कोण आहेत भारत भाऊ बोंद्रे?

चिखली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार
भारत भाऊ बोंद्रे हे 1972 साली प्रथम चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग चार वेळा त्यांनी चिखली विधानसभेचे प्रतिनिधित्व केलं होतं. राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांनी पाटबंधारे मंत्री, उद्योग मंत्री व शिक्षण मंत्री म्हणून पदे भूषवली होती. पाटबंधारे मंत्री असताना ते बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प, पेनटाकळी प्रकल्प व जिगाव प्रकल्पाचे ते प्रणेते होते. यासह त्यांनी राज्यातील शेकडो प्रकल्पांना त्यावेळी मंजुरी व गती दिली होती. त्यामुळे त्यांना राज्यात “जलपुरुष” म्हणूनही ओळखलं जात होतं. त्यांच्या निधनाने बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

9 जुलै 1933 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत त्यांचा जन्म झाला होता. बार्शीत शाळेत असताना ते राष्ट्रसेवा दलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले. तर महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते.शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी प्रचंड लेखन केलं आहे. त्याच्या या अकाली निधनाच्या बातमीने सोलापूरसह राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या उभारणीत भारतभाऊंचे मोठे योगदान होते.याशिवाय जिगाव प्रकल्प, पेन टाकळी प्रकल्प, कोराडी प्रकल्प, नळगंगा प्रकल्प यासह जिल्ह्यात अनेक छोटे-मोठे जल प्रकल्पांची भरणे भारत भाऊंच्या कार्यकाळात झाली. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल असे भारत भाऊ नेहमी म्हणायचे. गेल्या काही दिवसांपासून वृद्धत्वामुळे त्यांना शारीरिक व्याधी जडल्या होत्या. उपचारासाठी डॉ.तायडे यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलेले असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
