माजी नगरसेवकांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री ; मुंबईत राजकीय समीकरण बदलणार

मुंबई: नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षाचे लक्ष लागलं आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकींकडे साऱ्यांचं विशेष लक्ष असणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही नवी मुंबईतही जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे. या ऐन निवडणुकीत भरत जाधव यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नवी मुंबईत प्रामुख्याने भाजप आणि शिंदे गटाचं वर्चस्व असुन काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते संदिप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यानच भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भरत जाधव यांनी पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भरत जाधव यांच्या पक्षप्रवेशाने नवी मुंबईतील समीकरण बदलणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दुसरीकडे नवी मुंबईत शिंदे गटानेही अजित पवारांना जोरदार धक्का दिला आहे. नेरुळ येथील अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नेरुळमध्ये एका मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळेही नवी मुंबईतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
