राज्यात पावसाचा जोर वाढणार! पुण्यासह ‘या’ शहरांना अतिवृष्टीचा अलर्ट, जाणून घ्या..

मुंबई : राज्यातआठवड्याभरापासून पाऊसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे सर्वत्र पाणी साचलं असून मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता वीकेंड आला असून अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडतात.
राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसाचा जोर पुढचे दोन दिवस कायम असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोकणासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, पालघर आणि घाट भागात आयएमडीकडून अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे.
त्यामुळे शक्यतो आठवड्याच्या शेवटी घरीच रहा, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. अशात पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी.
नागरिकांना सूचना….
सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी अति महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावं. घाट माथ्यावर फिरण्यासाठी जाणं टाळा. सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे रुळ/ बस मार्ग या ठिकाणी जाणे टाळा.
डोंगराळ भागांत किंवा घाट माथ्यावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशा सूचना हवामान विभाग आणि प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मान्सून महाराष्ट्र राज्यात पुन्हा जोमाने सक्रिय होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट आणि अगदी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या भागांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जोरदार पाऊस झाल्यानं सखल भागांत पाणी साचले असून याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.