पाच मजली इमारत पत्त्याच्या गठ्ठ्यासारखी कोसळली ! तीसहून अधिक लोक गाडले….!
लखनौ : लखनौमध्ये मंगळवारी संध्याकाळी एका भयानक घटनेत, वजीर हसन रोड, वरील पाच मजली अपार्टमेंट इमारत पत्त्याच्या गठ्ठ्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली तीसहून अधिक लोक गाडले गेले.
माहितीवरून पोलीस, अग्निशमन दल, एसडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी बचावकार्य केले असून आतापर्यंत 14 जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
लखनौचे जिल्हाधिकारी, डीएम सूर्यपाल गंगवार यांनी सांगितले की, निवासी इमारत कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू आहे. आता कारवाई सुरूच राहणार आहे. 5-6 लोक अडकले आहेत. त्यापैकी काहींशी आम्ही संपर्क साधला आहे. त्यांना ऑक्सिजन दिला जात आहे.
डीजीपी डीएस चौहान यांनी सांगितले की, अजूनही पाच लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना योग्य ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. ते एकाच खोलीत आहेत. आम्ही दोन लोकांच्या संपर्कात आहोत. या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल.
पाच मजली अलाया अपार्टमेंटमध्ये एकूण 12 फ्लॅट आहेत. सर्वात वर एक पेंटहाउस आहे. सायंकाळी 6.30 च्या सुमारास अचानक इमारत कोसळली. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांव्यतिरिक्त एसडीआरएफ, लष्कर आणि अग्निशमन दलाचे जवान मदत आणि बचाव कार्यासाठी पोहोचले. एनडीआरएफची टीमही रात्री उशिरा पोहोचली. तीन-चार जेसीबी लावून ढिगारा हटवून हँड ड्रिलिंग मशिनच्या सहाय्याने ढिगारा कापून अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पथकांनी एक एक करून 12 जणांना बाहेर काढले. ढिगारा इतका आहे की तो काढण्यासाठी बराच वेळ लागेल. डीजीपी डीएस चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी आठ ते दहा कुटुंबे होती.