डान्स करताना लागलेला एक धक्का ठरला जीवघेणा; पाच जणांनी घेरलं अन्…पुण्यात ज्येष्ठासोबत भयंकर घडलं

पुणे : पुण्यातील औंध परिसरात किरकोळ वादाने हिंसक रूप घेतल्याची घटना समोर आली आहे. इंदिरा गांधी वसाहत येथे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करताना झालेल्या धक्क्यावरून दोन गट आमनेसामने आले.

या किरकोळ वादाचे रूपांतर काही क्षणांतच जोरदार हाणामारीत झाले. संतप्त झालेल्या एका टोळक्याने फिर्यादीच्या वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांना लाथाबुक्क्यांनी आणि हाताने मारहाण केली.
या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाणे यांनी तत्काळ कारवाई करत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुणाल तुजारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

प्रमोद घडसिंग, समीर घडसिंग, भय्या सरोदे, तेजस देवकर, ओंकार पाटोळे (सर्व राहणार: इंदिरा गांधी वसाहत, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, औंधमधील इंदिरा गांधी वसाहत येथे सुरू असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमात किरकोळ कारणावरून मोठा वाद उफाळल्याची घटना घडली आहे. कार्यक्रमादरम्यान फिर्यादी कुणाल तुजारे यांचे वडील नंदकिशोर तुजारे हे नृत्य करत असताना त्यांचा धक्का आरोपी प्रमोद घडसिंग याला लागला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वाद चिघळत गेला.
धक्का लागल्याच्या रागातून आरोपींनी नंदकिशोर तुजारे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी गेलेले कुणाल तुजारे आणि त्यांचा पुतण्या यांनाही आरोपींच्या टोळक्याने लक्ष्य केले. या टोळक्याने चौघांनाही बेदम मारहाण केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाणे यांनी तत्काळ कारवाई करत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चतुःशृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सार्वजनिक कार्यक्रमात शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.