तरडेत येथे शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांसह ५ जणांना बेदम मारहाण, ७ जणांवर गुन्हा तर तिघांना अटक

लोणी काळभोर : न्यायालयात वाद सुरू असतानादेखील शेतात अतिक्रमण करून दोन सख्ख्या भावांसह 5 जणांना शिवीगाळ, मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना तरडे (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 248 मध्ये गुरुवारी (ता.31 जुलै) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

या मारहाणीत लक्ष्मण राघू गडदे (वय ५५) व शिवा राघू गडदे ( रा तरडे, ता. हवेली जि. पुणे) अशी गंभीर जखमी झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. या भांडणात बबन लक्ष्मण गडदे, श्रीकांत लक्ष्मण गडदे व दत्ता नामदेव गडदे हे किरकोळ जखमी झाले आहेत. तर अंकुश रामभाऊ बरकडे (वय ४८), लहु रामभाऊ बरकडे (वय ४८), राजु रामभाऊ बरकडे वय ४२), राहुल लहु बरकते (वय २४), आदेश अंकुश बरकडे (वय १९) तुषार अंकुश बरकडे (वय २२) व गणेश लहु बरकडे (वय २०,सर्व रा तरडे ता हवेली जि पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण गडदे व शिवा गडदे हे दोघे सख्खे भाऊ असून ते तरडे परिसरात कुटुंबासोबत राहतात. शिवा गडदे हे फिर्यादी लक्ष्मण गडदे यांचे मोठे भाऊ आहेत. तरडे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 248 मध्ये गडदे यांची जमीन आहे. गडदे व आरोपी यांच्यामध्ये याच जमिनीवरून वाद झाला होता. आणि हा वाद न्यायालयात सुरू आहे. न्यायप्रविष्ठ वाद असल्याने न्यायालयाने याला स्टे दिला आहे.

दरम्यान, लक्ष्मण गडदे यांचा मोठा भाऊ शिवा गडदे यांनी गुरुवारी (ता.31 जुलै) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फोन करून सांगितले की, आपल्या शेतात कोणीतरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करीत आहेत. सदर ट्रॅक्टर तु लावला आहे का असे विचारले. तेव्हा लक्ष्मण गडदे यांनी मी ट्रॅक्टर लावलेला नाही. असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर फिर्यादी लक्ष्मण गडदे, मोठा भाऊ शिवा, मुलगा बबन व श्रीकांत गडदे आणि पुतण्या दत्ता गडदे हे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी ट्रॅक्टर बाबत विचारपूस केली असता, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली.
त्यानंतर आरोपी म्हणाले, तुम्हाला कशी जमीन मिळते ते मी पाहतो. तुम्हाला दाखवतो काय हिसका आहे तो. आयुष्यात पुन्हा भांडणे करण्याची इच्छा झाली नाही पाहिजे. एका एकाला मारुन टाकतो. अशी धमकी दिली. या मारहाणीत लक्ष्मण गडदे व शिवा गडदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लक्ष्मण गडदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कलम ११८ (१), १९१(२).१९१(३) १९०,३२९(३) ३५१ (२) ३५२.३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी अंकुश रामभाऊ बरकडे, तुषार अंकुश बरकडे व राजु रामभाऊ बरकडे या तीन आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील चार आरोपी अद्यापही फरार असून पोलिस आरोपींच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.
