जागतिक दूध उत्पादनात भारत प्रथम स्थानी…!
नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे. कारण जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा २४ टक्के वाटा आहे. जागतिक दूध उत्पादनात भारत हा प्रथम स्थानी आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी) मधील उत्पादनविषयक माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
२०२१-२२ मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात २४ टक्के योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वर्ष २०१४-१५ ते २०२१-२२ अशा गेल्या ८ वर्षांच्या कालावधीत भारताने दूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ नोंदविली, तर वर्ष २०२१-२२ मध्ये देशातील दूध उत्पादन २२ कोटी टनांपर्यंत वाढल्याचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यावेळी म्हणाले.
भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक राज्ये म्हणून उत्तर प्रदेश आणि राजस्थानकडे पाहिले जाते. भारतात उत्तर प्रदेश हे राज्य दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान दूध उत्पादनात दुस-या क्रमांकावर आहे.
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने याबाबतची माहिती दिली होती. राजस्थाननंतर दूध उत्पादनात मध्य प्रदेश तिस-याक्रमांकावर आहे. गुजरात चौथ्या क्रमांकावर तर आंध्र प्रदेश पाचव्या आणि पंजाब दूध उत्पादनात सहाव्या क्रमांकावर असल्याची माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने दिली.
देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदाने २४ टक्के आहे. भारतातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल, असा आहे. हा व्यवसाय गरीब देशांसाठी उद्योगांचे एक आदर्श उदाहरण ठरू शकेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते.
८ वर्षांत दूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ
गेल्या आठ वर्षांत देशात दुग्धोत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भारत जगात सर्वाधिक दुग्ध उत्पादन करण्यात यशस्वी ठरला आहे. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या ८ वर्षांत तब्बल ५१ टक्क्यांनी दुग्धोत्पादन वाढले आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थाला वाढती मागणी लक्षात घेऊन दुग्धोत्पादनात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने सरकारने योजना आखल्याचे रुपाला यांनी सांगितले.
महिलांचे दुग्ध विकासात तब्बल ७०% योगदान
भारत दुग्धोत्पादनात अव्वल स्थानावर आहे, याचे श्रेय महिलांनाच जाते. अर्थात भारताच्या दुग्ध विकास क्षेत्राचे खरे नेतृत्व महिलाच करत आहेत. कारण दुग्ध विकासात महिलांचे तब्बल ७० टक्के प्रतिनिधित्व असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे भारत जगात आपले स्थान टिकवून आहे.