लव्ह जिहाद कायद्याचा पहिला डॉफ्ट, राज्यात लव्ह जिहादचा कायदा येणार, फडणवीस सरकारकडून हालचालींना वेग…

पुणे : पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील तरुणीचे कथित अपहरण आणि लव्ह जिहादचा संबंध सध्या राज्यात गाजत आहेत. त्याचदरम्यान एक मोठी घडामोड घडली आहे. लव्ह जिहाद कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली वाढल्या आहेत.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि बळजबरीने धर्मांतरावर अंकुश आणण्यासाठी राज्य सरकार सरसावल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी विशेष समितीच्या दोन ते तीन बैठका झाल्या असून या समितीने तयार केलेला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याचे समजते.
राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकी झाल्या. लव्ह जिहाद कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीने या कायद्याचा पहिला मसुदा तयार केला आहे. हा मसुदा पुढील तपासणीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
फेब्रुवारी 2025 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीत महिला व बालविकास, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास तसेच गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. आतापर्यंत 2 ते 3 बैठका घेण्यात आल्या असून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. हा कायदा केवळ राजकीय भूमिका म्हणून नव्हे, तर कायदेशीरदृष्ट्या मजबूत आणि टिकणारा असावा यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, समितीने राज्यातील विद्यमान परिस्थितीचा आढावा घेतला आहे. प्रेमसंबंधाच्या नावाखाली फसवणूक करून किंवा दबाव टाकून धर्मांतर केल्याच्या तक्रारींचा अभ्यास करण्यात येत आहे.
तसेच देशातील इतर राज्यांमधील धर्मांतरविरोधी कायद्यांचा सखोल अभ्यासही केला जात आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे लागू आहेत. त्या कायद्यांतील तरतुदींचा विचार करून महाराष्ट्रासाठी योग्य आराखडा तयार केला जात आहे.