महायुती सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज सादर होणार!! शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार?

मुंबई : राज्यात महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधान भवनात सादर केला जाईल. यामुळे याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. घोषणांच्या अंमलबजावणीचा ताण, राज्यासमोरील कर्जाचा वाढता आलेख, वित्तीय शिस्त अशी आव्हाने असताना संतुलित अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे. सरकारने अनेक आश्वासने दिली होती.
ती पूर्ण होणार का? हे देखील समजणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेत राज्यमंत्री आशिष जैस्वाल हे दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडतील. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे.
राज्यातील जनतेच्या यामध्ये अनेक अपेक्षा आहेत. शेतकरी देखील याकडे लक्ष देऊन आहेत. येणाऱ्या काळात याबाबत त्यांना काय मिळणार की नाही हे समजेल. विधानसभेत सर्वाधिक वेळा पूर्ण अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या यादीत अजित पवार यांचा दुसरा क्रमांक लागतो.
यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. अजित पवारांच्या पाठोपाठ दहावेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी जयंत पाटील यांना मिळाली होती. मागील वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प लोकप्रिय घोषणांचा होता. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात अनेक योजनांचा वाटा होता.
त्यामुळे मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत वर्षभरातील पुरवणी मागण्यांचा आकार वाढला. यामध्ये सव्वा लाख कोटींच्या घरात पुरवणी मागण्या सादर झाल्या. आता वित्तीय शिस्तीचा गाडा रुळावर आणण्याचे मोठे आव्हान महायुती सरकारपुढे असणार आहे. अनेक योजना देखील बंद होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजनांचा वित्तीय भार तिजोरीवर पडत असल्याचे सरकारला कळून चुकले आहे. यामुळे यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आता सत्ताधारी नेत्यांना कोणत्याही कल्याणकारी योजनेला कात्री लागणार नसल्याचे सांगावे लागत आहे. यामुळे अजित पवार काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.