आगीचा भडका! मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारतीला भीषण आग, 6 जण होरपळले

मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या इमारतीला लागलेल्या आगीत ६ जण होरपळल्याची माहिती मिळाली आहे. या आगीतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या जखमीमध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या घाटकोपर पूर्वेकडील ९० फिट रोडवरील साई नगरमध्ये असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इमारतीला लागलेल्या आगीत सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे.या आगीत काही जण अधिक प्रमाणात भाजले गेले आहेत. तर काही जण १० ते १२ टक्के भाजले आहेत.

इमारतीला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या व्यक्तींचे नावे समोर आलं आहे. प्रतिक कुमार मुखिया, गौरी मुखिया, प्रशांत विश्वकर्मा, पूजा मुखिया, दलत देवी मुखिया, नागेश्वर मुखिया हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची प्रकृती स्थिर आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

