मुंबईत आगीचा भडका ; घाटकोपरच्या रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बर्गर शॉपला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीच्या घटना वारंवार घडत आहेत.घाटकोपरमध्ये सात मजली इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या बर्गर शॉपला भीषण आग लागली. सुदैवानं दुकानातील कर्मचारी प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या श्रद्धानंद रोडवरील बर्गरच्या दुकानाला आज, बुधवारी भीषण आग लागली. काही वेळाने आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या.या घटनेनंतर स्थानिकांनी धावाधाव केली.अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही आग आजूबाजूच्या दुकानात पसरली नाही. या आगीत संपूर्ण दुकान खाक झाले आहे.
दरम्यान या घटनेनं गोंधळ काही काळ निर्माण झाला होता. दुकानातील कर्मचारी वेळीच बाहेर पडले. त्यामुळं जीवितहानी टळली. आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी धावाधाव केली आणि अनर्थ टळला.
