आगीचा भडका; वाराणसीच्या मंदिरात आरतीदरम्यान आग; पुजाऱ्यांसह 9 जण होरपळले, 4 जणांची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या चौक परिसरात असलेल्या आत्म विश्वेश्वर मंदिरात आरतीदरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. आरतीच्या ताटात लागलेल्या आगीने मंदिरात केलेली कापसाची सजावट उद्ध्वस्त केली.या आगीत पूजारी आणि ९ भाविक होरपळले आहेत. या पैकी ४ जणांची प्रकृती अधिक गंभीर असून, त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात शनिवारी 9 ऑगस्ट रात्री एक मोठी दुर्घटना घडली.वाराणसीच्या चौक पोलीस स्टेशन परिसरातील संकट गली येथे स्थित आत्म विश्वेश्वर मंदिरात आरती सुरू असताना, एक जळता दिवा पडला आणि तिथे असलेल्या कापसाच्या सजावटीने पेट घेतल्याने मंदिराला आग लागली. अपघाताच्या वेळी मंदिरात शेकडो भाविक उपस्थित होते.या अपघातात पुजाऱ्यासह नऊ भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच डीएमसह अनेक उच्च अधिकारी रुग्णालयात पोहोचले. आगीच्या घटनेतील जखमींची ओळख पटली असून, या जखमींमध्ये प्रिन्स पांडे, बैकुंठनाथ मिश्रा, सानिध्या मिश्रा, सत्यम पांडे, शिवानी मिश्रा, देव नारायण पांडे आणि कृष्णा यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रथम विभागीय रुग्णालयात आणि नंतर महमूरगंज येथील जेएस मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.