अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल, कोट्यवधींची झालीय फसवणूक, सिनेसृष्टीत खळबळ..

हरियाणा : हरियाणातील सोनीपतमध्ये बॉलिवूडचे दोन अभिनेते श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण इंदूरमध्ये नोंदणीकृत असलेल्या सोसायटीतील ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेलेल्या कंपनीच्या प्रमोशनशी संबंधित आहे.

हा एफआयआर हरियाणातील सोनीपतमध्ये नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याविरुद्ध गुंतवणुकीचं आवाहन करत कंपनीची जाहीरात केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या कंपनीच्या कार्यक्रमात सोनू सूद देखील प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, या कंपनीने ६ वर्षांपूर्वी लोकांकडून पैसे वसूल केले. कंपनीत फिक्स्ड डिपॉझिट किंवा इतर मार्गांनी गुंतवणूक केल्यास लोकांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देण्यात आले.

एवढंच नाही तर, लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी महागड्या आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले गेले आणि प्रोत्साहनांच्या नावाखाली बहु-स्तरीय मार्केटिंगच्या धर्तीवर एजंट तयार केले गेले.
सुरुवातीला कंपनीनं काही लोकांना पैसे दिले, पण जेव्हा कोट्यवधी रुपये जमा झाले, तेव्हा प्रकरण वेगळ्याच वळणावर गेले, असे सांगितले जात आहे. आता कंपनी पैसे देण्यास कानकूस करत होती आणि जेव्हा लोकांनी पैसे मागू लागले, तेव्हा कंपनीचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करू लागले.