योगगुरू रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल…!

बाडमेर : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथित चमत्कारांचा वाद सुरू आहे. त्याच दरम्यान आता योगगुरू बाबा रामदेव यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. राजस्थानमधील बाडमेर इथे बाबा रामदेव यांनी मुस्लिम आणि इस्लाम संदर्भात वादग्रस्त विधान केले.
बाबा रामदेव यांनी एका कार्यक्रमात म्हटले, इस्लाम धर्माचा अर्थ केवळ नमाज पठण करणे आहे. मुसलमानांनी केवळ नमाज पठण करणे गरजेचे आहे. नमाज पठण केल्यावर काहीही करा, ते सर्व योग्य असेल. मग ते, हिंदू मुलींना उचलून नेणे असो किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी बनून जे हवे ते करा.
बाबा रामदेव यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. बाबा रामदेव यांच्याविरोधात आता बाडमेरच्या चौहटन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्यावर धार्मिक भावना दुखावणे आणि सामाजिक सलोखा बिघडवल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला.
याच प्रकरणात बाबा रामदेव यांच्याविरोधात कलम १५३-अ, २९५-अ आणि २९८ लावण्यात आले आहेत. चौहटन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बाडमेर जिल्ह्यात संत धर्मपुरी महाराजांच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान बाबा रामदेव यांनी लोकांना धर्माभिमानाचा संदेश दिला. यावेळी त्यांनी इस्लामविरोधी वक्तव्य केले. मुस्लीम धर्माबाबत त्यांनी जाणूनबुजून हे विधान केले, त्यामुळे समुदायांमध्ये वैर, द्वेष किंवा दुर्भावना निर्माण झाली आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्याने शत्रुत्व वाढवणे आणि समाजातील विविध घटकांमधील सलोखा बिघडवण्याचे काम केले जात असून त्यामुळे सद्भावना आणि परस्पर बंधुभावाला तडा गेला आहे असे नमूद करण्यात आले आहे.