अखेर मान्सूनची राज्यातून माघार, थंडीचा जोर वाढला, ऑक्टोबर हिटमुळे तापमानात बदल…

मुंबई : पावसाच्या माघारीसोबतच आता ऑक्टोबर हीटची जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांनी शुक्रवारी असह्य उकाडा अनुभवला. येत्या आठवड्याभरात कमाल तापमानाचा पारा मुंबईत ३५ अंशांपर्यंतही जाऊ शकतो.
गेल्या १५ दिवसांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास खोळंबलेला होता. दरवर्षी ५ ऑक्टोबरला खान्देशात प्रवेशणारा परतीचा मान्सून, यावर्षी १० ऑक्टोबरला प्रवेशला. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातून मान्सून माघार घेईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत नैर्ऋत्य मौसमी वारे देशाबाहेरही जातील अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी मुंबईसह देशातून १५ ऑक्टोबरला मान्सूनचा माघारीचा प्रवास संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. मुंबईतून यंदा सर्वसाधारण ८ ऑक्टोबरऐवजी १० ऑक्टोबरला मान्सून बाहेर पडला. या मौसमात आत्तापर्यंत सांताक्रूझ येथे ३,०१२ मिलीमीटर, तर कुलाबा येथे २,२६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबरमध्ये पावसाचा ऋतू अधिकृतरित्या संपल्यानंतर १ ते १० ऑक्टोबरदरम्यान कुलाबा येथे ७२ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे ३१.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे ७ आणि ८ ऑक्टोबरला २४ तासांमध्ये हलक्या सरींची नोंद झाली होती. मात्र सांताक्रूझ येथे गेल्या तीन दिवसांमध्ये पावसाची अजिबात नोंद झालेली नाही.
वातावरणात अजूनही आर्द्रता आहे. १० ऑक्टोबरला सकाळी कुलाबा येथे ८१ टक्के, तर सांताक्रूझ येथे ७२ टक्के आर्द्रता नोंदली गेली. तर सायं. ५.३० वाजता कुलाबा येथे ६०, तर सांताक्रूझ येथे ६१ टक्के आर्द्रता नोंदली गेली. यातच मुंबईचे कमाल तापमानही शुक्रवारी अधिक वाढले.
सांताक्रूझ येथे ३३.७ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीच्या आसपास असले तरी आर्द्रता तसेच पूर्वेकडून वाहणारे वारे यामुळे मुंबईकरांची अस्वस्थता शुक्रवारी वाढलेली होती.