पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! अखेर ‘या’ २ महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारी मेट्रो धावणार, जाणून घ्या…


पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्येला मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-2 अंतर्गत खडकवासला–स्वारगेट–हडपसर खराडी या मुख्य मार्गातील दोन उपमार्गांना मंजुरी मिळाल्याने हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या विभागात मेट्रो बांधणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

पुणे शहरातील मेट्रो नेटवर्क विस्तारासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी घडामोड ठरली आहे. या दोन उपमार्गांना मान्यता मिळाल्यानंतर टप्पा-2 च्या कामांना आता अधिक गती मिळणार आहे.

हडपसर, लोणी काळभोर, फुरसुंगी आणि सासवड परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली असून वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर या भागांतील दैनंदिन प्रवास तुलनेने जलद, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

       

सरकारच्या मंजुरीनंतर या दोन उपमार्गांवर मेट्रो उभारणीसाठी आवश्यक प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या मिळून 16 किलोमीटर लांबीच्या उपमार्गांत एकूण 14 उन्नत स्थानके उभारण्यात येतील असे नियोजन आहे.

अंदाजे 5 हजार 704 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी प्रत्येक मेट्रो रेकमध्ये तीन डबे असतील आणि सुमारे 975 प्रवाशांची क्षमता ठेवण्यात आली आहे. प्रकल्पाला सुरूवात झाल्यानंतर चार वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हडपसर ते लोणी काळभोर हा पहिला मार्ग 11.102 किलोमीटर लांबीचा असणार आहे, तर हडपसर बस डेपो ते सासवड रोड हा दुसरा उपमार्ग 5.557 किलोमीटर लांबीचा असेल. या दोन्ही मार्गांच्या बांधकामासाठी महापालिकेकडून जमीन, भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी 403.36 कोटी रुपये महामेट्रोला देण्याचे निर्देश दिले आहेत. डिसेंबर 2029 पर्यंत हे दोन्ही मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, हडपसर ते लोणी काळभोर मेट्रो मार्गात 16.31 हेक्टर जमिनीची गरज असून प्रकल्पाचा खर्च 4 हजार 152 कोटी रुपये इतका निश्चित आहे. त्याचप्रमाणे हडपसर ते सासवड रोड मार्गासाठी 0.8 हेक्टर जमीन आवश्यक असून या मार्गावर 1 हजार 552 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पूर्व पुणे, सासवड रोड परिसर, तसेच आसपासच्या उपनगरी भागांचा विकास वेगाने होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!