अखेर अजितदादांना मंत्रालय दालन मिळाले, कारभारालाही केली सुरुवात…

मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आठ दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाचं खात वाटप झालेलं नाही. राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व नऊ मंत्री बिना खात्याचेच आहेत. खाती मिळाली नसली तरी मंत्र्यांनी मंत्रालयात कामाला सुरुवात केली आहे.
अजित पवार यांना अद्याप दालन देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी मंत्रालयातून काम सुरू केले नव्हते. मात्र आज सकाळीच अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यांना केबिनही देण्यात आली आहे.
मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दालन असलेल्या सहाव्या मजल्यावर अजित पवार यांना दालन देण्यात आलेले नाही. या केबिनच्या बाहेर अजितदादा यांचे नावही लिहिण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळीच अजितदादांनी या केबिनमध्ये येऊन आपल्या कारभाराला सुरुवातही केली आहे.
अजित पवार यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर दालन देण्यात येणार आहे. ६०२ क्रमांकाची केबिन रिक्त आहे. पण ही केबिन शापित असल्याने कोणीच ही केबिन घेत नाही.
अजित पवार यांनीही ही केबिन घेतली नाही. त्यामुळे बाजूच्या दोन केबिन एकत्रित करण्याचं काम सुरू असून ही नवी केबिन अजित पवार यांना देण्यात येणार आहे. त्या केबिनचं कामही सुरू आहे.
मात्र, त्यात वेळ जाणार असल्याने अजित पवार यांच्यासाठी पाचव्या मजल्यावर ५०२ क्रमांकाची केबिन देण्यात आली आहे. अजितदादांना ५०२ क्रमांकाच्या केबिनमध्ये तात्पुरती बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोणत्या खात्याचं काम पाहणार?
अजितदादा सकाळीच देवगिरी या आपल्या निवासस्थानावरून निघाले आणि त्यांनी तडक मंत्रालयात येऊन कारभार स्वीकारला. थोड्यावेळाने ते विधानभवनातही जाणार आहेत. मात्र, खाते वाटपच झालेलं नाही. त्यामुळे अजितदादा कोणत्या खात्याची कामे पाहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अजितदादा नेहमीप्रमाणे सकाळी सकाळीच कार्यालयात आल्याने अधिकाऱ्यांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या आहेत. अजितदादा हे सकाळी लवकर काम सुरू करतात. उशिरापर्यंत त्यांचं काम सुरू असतं. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनाही लवकरच मंत्रालयात पोहोचावे लागणार आहे.